Saturday, July 16, 2011

जेव्हा बाबा आई होतात...

खरं तर आई ह्या शब्दामध्य़ेच सगळं जग सामावलेलं आहे असं म्हणतात. पण बाबांशिवाय आई हा शब्द तेवढाच अपुरा आहे याचा ब-याचदा विसर पडतो.
बाबा हे आईची माया देऊ शकत नाहीत हे जरी खरं असलं तरी ह्याचा अर्थ असाही होतो की बाबांची मायाही आई देऊ शकत नाही.. हो ना?

एकदा प्रवासात एक मुलगा भेटला होता त्याचीच ही गोष्ट काव्यबद्ध करण्याचा केलेला छोटासा प्रयत्न...!!!


बालपणी मी बाबांस एक प्रश्न विचारला
कुठे आहे मझी आई? तेव्हा बाबा ही हसला..
                मग हाताशी धरून तो चांदण्यात गेला
                दाखविली आई अन उत्तरता झाला..

आता बघता आकाशी ते चांदणे हसते
म्हणे, तुझी आई तुजपाशी तु का आकाशी शोधते?

                निजले मी मग राती आई डोळ्यांत भरून
                हात माथ्यावरी आला गेला अंगाई गाऊन..

आज मिटलेले डोळे एक स्वप्न पापण्यांत
येईल माझी आई आणि घेईल मिठीत..

                मग पहाटे एकदा मला जाग आली
                होती माथ्यावर कापडाची पट्टी ओली..

होते निजलेले तेव्हा बाबा माझ्या पायापाशी
पाणी आणि पट्टी दोन्ही घेऊनी हाताशी..

                घेतले मी कुशी त्यांना गेले डोळे पाणावुन
                ते झाले होते आई एका अंगाई मधून..

चांदण्यास मग राती मी हसून बोलले
वेडी होते मी जिने आईस शोधले..

                बाबा सोबती मी तेव्हा डोळे भरून रडले
                आई कधी येईल मग नाही विचारले..

-मंगेश केळकर

3 comments: