Sunday, August 28, 2011

पैलतीर...


सध्या माणसाचं महत्त्व एक "माणूस" म्हणून कमी होत चाललं आहे. आज काल मैत्री करताना सुद्धा हा मित्र पुढे आपल्याला कसा उपयोगी येईल याचा विचार आधी होतो आणि मगच मैत्री होते.
नाती जपण्याआधी स्वार्थ जपला जातो आणि ह्याला "काळाची गरज" असं म्हणून दुर्लक्षित केलं जातं.
जो पर्यंत माणसाच्या शब्दाला किंमत आहे तो पर्यंत त्यालाही किंमत असते, पण जेव्हा त्याचे शब्दच संपतात तेव्हा माणूस म्हणून देखील त्याला कवडी मोलाचीही किंमत मिळत नाही.
क्षणार्धात सगळ्या गोष्टी होत्याच्या नव्हत्या होऊन जातात.


                         नाव ती लाटेवरी काठावरून मी पाहिले
                         पाहिले जे ह्या तटावरी त्या तटावरी राहिले...

                         पाहता तो डोह मोठा श्वास माझा थांबला
                         भान सारे भंग झाले अश्रु सारे वाहिले...

                         पापण्या लवल्या जरा त्या अश्रुंना थांबावया
                         अश्रु सारे हासती डोळ्यांमधे ना थांबले...

                         शब्द आणि अर्थ त्यांचे वित्त त्यांना मोजुनी
                         भाबडी ती मूर्त त्याची देतसे धुडकावुनी...

                         पाहतो मी आज ज्यांना हे ते नव्हे जे पाहिलेले
                         मित्र आणि आप्त सारे दूर आज राहिलेले...

                        -मंगेश केळकर

Friday, August 12, 2011

कधी कधी असं वाटतं...


ह्या जगात न थांबणारी एकच गोष्ट म्हणजे "वेळ". रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात हा "वेळ" कसा, कधी आणि कुठे निघुन जातो ह्याचं आपल्याला भानंच राहत नाही. वेळ निघुन गेल्यावर मात्र नेहमीच वाटतं राहतं की काहीतरी राहून गेलं. मग अशावेळी आपल्या आठवणीतले छोटे छोटे क्षण देखील ही उणीव भरून काढणारे ठरतात. खूप महत्त्वाचे आणि अमूल्य असे वाटतात.

खरंच, जीवनातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लाखमोलाचा ठेवा असतो आणि तो आपण सगळ्यांनीच जपायला हवा.


                             कधी कधी असं वाटतं त्याच कट्ट्यावर पुन्हा जमावं,
                             मित्र आणि कटिंग सोबत तासंतास पडून रहावं...
                             शाळेच्या गप्पा आणि कॉलेजचे किस्से व्हावेत,
                             प्रोफेसर्स्‌च्या नकला आणि गिटारवरचं एक गाणं व्हावं...

                             कधी कधी असं वाटतं तिच पिकनीक पुन्हा निघावी,
                             भरलेल्या पावसात घाटामधुन गाडी आपली स्वैर फिरावी...
                             समुद्रावरचे किस्से अन्‌ डोंगर सारे सर करावेत, 
                             एक तरी पेग चीअर्स करून रात्र सुध्दा गाजवून द्यावी...

                             कधी कधी असं वाटतं बॉसचं म्हणणं मुद्दाम टाळावं,
                             मिटिंग रिक्वेस्ट डिनाय करून मस्त कॅन्टिन मधे फिरत बसावं,
                             लेक्चर बंक केल्याची मग आठवण व्हावी 
                             आणि प्रोक्झी लागल्याचं समाधान पण मिळावं...

                             कधी कधी असं वाटतं पुन्हा ताईची खोडी काढावी,
                             मग बाबांनी ओरडा द्यावा आणि आईनी माया करावी...
                             असं वाटतं मनातलं सारं काही बोलून जावं,
                             पण तिची नजर वळण्याआधीच आपली बोलती बंद व्हावी...

                             मग मधेच कधीतरी असं वाटतं हे सगळं परत घडेल का?
                             निसटलेल्या गोष्टी पुन्हा आपल्या हाती येतील का?
                             मग मनात कितीही वाटलं तरी वेळ असाच निघुन जातो
                             प्रश्न फक्त एकच राहतो की "ह्या आठवणी तरी राहतील का?"

                            -मंगेश केळकर


Tuesday, August 9, 2011

पुन्हा एकदा तेच...


माझ्या, तुमच्या खरंतर सगळ्यांच्याच आयुष्यातला "कॉलेज आणि कॉलेजमधली प्रकरणं" हा न विसरणारा आणि जन्मभर पुरणारा विषय... १० वर्षांनी भेटल्यावर सुद्धा मित्राचा पहिला प्रश्न असतो "काय रे बाळ्या, तुझी "ती" कशी आहे?? काही Contact अजुन??" आणि त्यावर बाळ्याचं ठरलेलं उत्तर "अरे बंड्या, नक्की कोणाबद्द्ल विचारतोयस??"


खरंच, कॉलेज आणि नवीन नोकरी लागल्यानंतरचे ते सोनेरी दिवस म्हणजे सगळ्यांसाठीच एक पर्वणी असते... एक कधीही न विसरणारा प्रवास असतो.. ह्याच प्रवासाचं हे एक छोटसं प्रवासवर्णन...



                      तुझे माझे ते दोन क्षण अजुन मला आठवतात
                            हलक्या पावसाच्या त्या बेधुंद सरी अजुनही सुखावतात...

                      पहिल्यांदाच डायल केलेला तुझा नंबर अजुनही आठवतो
                      आणि नंतर मिळालेला दादाचा ओरडा अजुनही हसवतो...

                      रोज रात्रीचं आपलं तेच तेच बोलणंही किती नवीन वाटायचं
                      "उद्या काय?" म्हणता म्हणता खरंच "उद्या" उजाडायचं...

                      मग पुन्हा तीच लोकल, तोच डबा, तीच माणसं अन्‌ त्याच गप्पा
                      तोच बेंच, तोच प्रोफेसर, तेच लेक्चर पण तुझा माझा विषयच निराळा...

                      कॅन्टिन मधला कटिंग आणि मित्रांचा कट्टा
                      त्यात तुझं माझं वेगळं राहणं मग मित्रांची थट्टा...

                      संध्याकाळच्या लोकलनी मग पुन्हा घरी निघायचं
                      तुझा नंबर डायल करून तेच रुटिन चालू करायचं...

                      प्लेसमेंट्स झाल्या कॉलेज संपलं नवीन आयुष्य सुरू झालं
                      ट्रेन बदलली, माणसं बदलली पण रुटीन मात्र तेच राहिलं...

                      मग पुन्हा एकदा तेच ऑफिस, तोच प्रोजेक्ट, तेच कलिग्स्‌
                      त्याच पार्टीस्‌, त्याच मिटींग्स्‌ पण पुन्हा तुझा माझा अजेंडाच निराळा...

                      आता फक्त वाट बघतोय त्या तुझ्या होकाराची
                      तुझ्या मझ्या ड्युएटची आणि आई बाबांच्या प्रश्नांची...

                      असं वाटतंय पुन्हा एकदा तसंच कहीसं म्हणावं
                      तेच नातलग, तीच माणसं, घरही तेच पण तरिही तुझा माझा संसारच निराळा…

                      -मंगेश केळकर

Thursday, August 4, 2011

तिचं असणं...

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ नक्कीच येते जेव्हा त्याला "तिचं असणं" खूप हवंहवंसं वाटतं.. तिच्या सोबत असण्याची, तिला भेटण्याची कारणं मन शोधायला लगतं.. खरंतर कारणं कित्येक असतात, पण नक्की कोणतं हे कळंत नसतं.. 

खरंच, तेव्हा "तिचं असणं" हेच फक्त महत्त्वाचं असतं..



तुझं असणं म्हणजे क्षितीजासारखं,
जवळ यावं म्हटलं तर दूर जातेस, आणि थांबून राहिलो तर आशेनी बघत राहतेस...

तुझं असणं म्हणजे संधीप्रकाश,
मावळतीच्या सूर्याकडे पहाटेच्या आशेने बघणारी सुंदर संध्याकाळ...

तुझं असणं म्हणजे इंद्रधनुष्य,
सप्तरंगी आकाशाचं उलगडणारं रहस्य...

तुझं असणं म्हणजे ओल्या मातीचा गंध,
चातकाची ती ओढ अन्पहिल्या पावसातुन मिळणारा निखळ आनंद...

ह्या तुझ्या असण्यासाठीच मी जगतोय,
कधी येशील गं तू, तुझी वाट पाहतोय...


                  -मंगेश केळकर

Monday, July 25, 2011

फक्त तुझ्यासाठी...


एकदा एका पुस्तकात वाचलं होतं, About "Love at first Sight". एखादी मुलगी किंवा मुलगा आपल्याला suitable आहे की नाही, किंवा तिच्या सोबत आपण coffee साठी जावं की नाही, गेलो तर कुठे किंवा कोणती coffee?? हे सगळं मनात ठरायला फक्त ८ सेकंदाचा वेळ लागतो. एखादी मुलगी कितीही सुंदर असली तरी CLICK होतेच असं नाही. पण ते CLICK होणं म्हणजे काय याची प्रचिती नक्कीच येते.

म्हणूनच ह्या चार ओळी, फक्त तिच्यासाठी...... Dedicated to “Her”…!!!


                                               फक्त तुझ्यासाठी....

                           तु कोण आहेस माहित नाही, कशी आहेस कळत नाही
                           तुझं हसणं मी फक्त ऐकलंय आणि मनामध्ये साठवलंय...
                            
                           तुझं ते "नाही" म्हणणं तरीही फोनवरचं लाजणं,
                           आह...विसरता विसरत नाही..
                           तुला भेटावं म्हटलं तर तुला तेवढा वेळही नाही...

                           फक्त एकदाच बघून तुझा फोटो माझा चेहरा खुलला
                           क्षणाचाही विचार न करता मनातल्यामनात होकार देऊन टाकला..

                           तो होकार तुझ्यापर्यंत पोचला नसेलही, पण मझ्या मनात नक्की आहे
                           तुझं उत्तर माहीत नाही, पण माझी बात पक्की आहे...

                           आज भेटू, उद्या भेटू, असेच दिवस मोजतोय
                           कधीतरी येईल होकार या आशेवर जगतोय...

                          
                          -मंगेश केळकर


Saturday, July 16, 2011

जेव्हा बाबा आई होतात...

खरं तर आई ह्या शब्दामध्य़ेच सगळं जग सामावलेलं आहे असं म्हणतात. पण बाबांशिवाय आई हा शब्द तेवढाच अपुरा आहे याचा ब-याचदा विसर पडतो.
बाबा हे आईची माया देऊ शकत नाहीत हे जरी खरं असलं तरी ह्याचा अर्थ असाही होतो की बाबांची मायाही आई देऊ शकत नाही.. हो ना?

एकदा प्रवासात एक मुलगा भेटला होता त्याचीच ही गोष्ट काव्यबद्ध करण्याचा केलेला छोटासा प्रयत्न...!!!


बालपणी मी बाबांस एक प्रश्न विचारला
कुठे आहे मझी आई? तेव्हा बाबा ही हसला..
                मग हाताशी धरून तो चांदण्यात गेला
                दाखविली आई अन उत्तरता झाला..

आता बघता आकाशी ते चांदणे हसते
म्हणे, तुझी आई तुजपाशी तु का आकाशी शोधते?

                निजले मी मग राती आई डोळ्यांत भरून
                हात माथ्यावरी आला गेला अंगाई गाऊन..

आज मिटलेले डोळे एक स्वप्न पापण्यांत
येईल माझी आई आणि घेईल मिठीत..

                मग पहाटे एकदा मला जाग आली
                होती माथ्यावर कापडाची पट्टी ओली..

होते निजलेले तेव्हा बाबा माझ्या पायापाशी
पाणी आणि पट्टी दोन्ही घेऊनी हाताशी..

                घेतले मी कुशी त्यांना गेले डोळे पाणावुन
                ते झाले होते आई एका अंगाई मधून..

चांदण्यास मग राती मी हसून बोलले
वेडी होते मी जिने आईस शोधले..

                बाबा सोबती मी तेव्हा डोळे भरून रडले
                आई कधी येईल मग नाही विचारले..

-मंगेश केळकर

COLLEGE कट्टा...!!!

आपल्याकडे म्हणतात ना, गद्धे पंचवीशी किंवा सोळावं वरीस धोक्याचं वगैरे वगैरे... तर हा १६ ते २५ असा ९ वर्षांचा काळ सुवर्णकाळ असतो म्हणायला हरकत नाही... याच सुवर्णकाळात घडलेला एक छोटासा प्रसंग...

Engineeringचं College नुकतंच चालू झालेलं... सगळ्यांची नजर College मध्ये येणा-या नवीन चेह-यांवर टिकून होती... त्यातच एक मुलगी दिसली.. सबसे अलग सबसे जुदा वगैरे वगैरे अशी असणारी...

These Lines are dedicated to her...!!! फक्त तिच्यासठी...!!!



माझी पहिली नजर, जेव्हा पडली तिच्यावर
डोळे माझे बधीर झाले, बसलो मी हात घेऊन हातावर...

म्हटलं एवढी सुंदर मुलगी, जरा नाव पत्ता काढू
आधी update करू database मग पुढचं काय ते पाहू...

म्हणून म्हटलं बघू जरा चार-पाच जणांना विचारून
तेव्हा "काय राव चेष्टा करताय" अश्या प्रतिक्रीया आल्या मागून... (हे "राव" वगैरे म्हणजे माझ्यावर झालेला पुण्याचा effect आहे :-) )

तेव्हा म्हटलं ही पोरगी भलतीच interesting दिसत्ये
आता नाव पत्ता काढल्याशिवाय मला झोप कुठली लागत्ये...

मग म्हटलं उद्या collegeला एकदम चकाचक होऊन जायचं
पहिल्याच भेटीत तिला एकदम impress करून टाकायचं...

(आता एवढी सगळी तयारी म्हणजे Collegeला जायला हमखास late)
मग दुस-या दिवशी मला Lectureला जायला जरा Late झाले
आणि PROXY माझी Cancel करून "तिने"च मला बाहेर काढले... :-( :-( :-(

-मंगेश केळकर