Monday, December 21, 2015

नातं मैत्रीचं..!!


परवाच एका मैत्रिणीचं लग्नं ठरल्याचं कळलं... म्हटलं लग्नानंतरचे चार पावसाळे जास्त बघितलेल्या आम्ही जरा चार मोलाचे शब्द त्यांना ऐकवावेत... त्याचेच औचीत्य साधून त्यांना पाजलेले हे उपदेशाचे डोस…


To… (खरंतर whom so ever it may concern)
लाईफच्या flow-chart ला Start करण्याआधी हे जरूर वाचा....!!!

मैत्रीचं नातं जरा अजीबच असतं
Ctrl C - Ctrl V सारखं copy paste नसतं

कॉफी टेबलावरच्या गप्पांसारखं conclusion less असतं
कुठे start कुठे end काहीच कळंत नसतं

Friendship ला खरंतर कुठलंच Logic नसतं
effort estimation आणि delivery plan चं मुळीच ओझं नसतं

Start कुठली End कुठला याचा विसर पडतो
जेव्हा अधे मध्ये अडखळल्यावर सुद्धा तो हात धरून सावरतो

मित्र होतात मित्र आहात मित्रांसारखेच रहा
नात्यामध्ये अडकलात तरी मैत्री Enjoy करून पहा…


-मंगेश केळकर
(२१ डिसेंबर २०१५)


Tuesday, November 24, 2015

'दृष्टि''कोन'

प्रत्येक पुरूषाच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची आणि हक्काची स्त्री म्हणजे त्याची बायको. नवरा आणि बायको नेहमीच एकमेकांना Taken For Granted घेत असतात.. त्यांच्याच आयुष्यातील ही एक गंमत.


'दृष्टि''कोन'


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तिचं आणि माझं कधीच सेम नसतं...


(बघा ना)
तिला वाटतं आता आपलं लग्न जुनं झालं,
गप्पा गोष्टी प्रेम Romance सगळं काही विरून गेलं...


(माझं मात्र असं नाही)
मला वाटतं लग्न एका OLD WINE सारखं असतं,
जितकं जुनं तितकंच ते हवं हवस वाटतं...


WINE चं नाव काढता तिने हळूच नजर फिरवली,
आणि "कंट्रोल मध्ये प्या" अशी आठवण करून दिली...


तेव्हा तिला कळून चुकलं (बिचारा) नवरा अजुन तसाच आहे,
पण लग्नानंतर तिचाच थोडा 'दृष्टि''कोन' बदलला आहे...


-मंगेश केळकर
२४-नोव्हेंबर-२०१५

Monday, April 21, 2014

दादू

Elder Care Issues: How to Reduce Caregiver Anxiety Symptoms

परवा आमच्या कट्ट्यावर पहिल्यांदाच दादू आला होता
नव्वदीचा असेल पण पहिल्यापासूनच चेहरा जरा ओळखीचा वाटत होता

जेष्ठ नागरिक कट्ट्यावर हे काका नवे होते
सर्वांनाच ते कोण आहेत ह्याचे मोठे कुतुहल होते

माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यानी सुरुवात केली
पहिलाच शब्द ओठी येता मोठ्ठी ढास लागली

पाणी दिले थोडे मग दादू बोलू लागला
स्वत:चे नाव सोडून बाकी सगळं काही सांगू लागला

म्हणाला कलेक्टर होतो शहराचा माझा मोठ्ठा मान होता
विचारा तुमच्या वडिलांना शहरात माझा दरारा होता

लग्न करून सेटल झालो एका गोंडस बाळाचा बाप झालो
’विश्वास’ नाव ठेवून सुद्धा पंचवीस वर्षांनी पस्तावलो

म्हणा नावात काय आहे आमचे नशीबच फुटके होते
बापानी विणलेल्या गोधडीचे धागेच जरा ढिले होते

स्वप्नामागे धावता धावता तो सत्य मात्र विसरून गेला
गोधडीचे ढिले धागे एका क्षणात तोडून गेला

नाही म्हणायला बापासाठी एक गोष्ट केली होती
या आश्रमाची दारे त्यानी उघडी करून दिली होती

मग काही वर्षांनी कळले तो ही गोधडी विणतो आहे
विश्वासाने हळू हळू एक एक धागा ओवतो आहे

त्याच गोधडीच्या उबेत एक छान पिल्लू मोठे झाले
थोड्याच दिवसांत पंख फुलवून ते देखील तसेच उडाले

पंचवीस वर्ष या आश्रमात आनंदानी राहत होतो
आज त्यालाही इथे बघून पुरता निराश झालो होतो

समोर बघून थांबला पण ओळखलं मात्र नाही
हळुवार हसून पुढे निघाला काही बोलला ही नाही

त्याची नजर मी वाचली होती भाव त्याचे कळले होते
आठवले ते क्षण जे पंचवीस वर्षांपूर्वी बघितले होते

हाक मारून त्याला जवळ मी बोलावले
माझं नाव कसं माहित म्हणून त्याने विचारले

म्हटलं कुंभाराला त्याचा प्रत्येक घडा माहित असतो
कसाही आकार असला तरी त्यानीच तो घडवलेला असतो

काळजी करू नकोस, इथे आपल्या सगळ्यांचंच सगळं सारखं असतं
स्वत:चं आयुष्य स्वत:च कोरायचं असतं आणि ह्या जन्मीचं ह्याच जन्मी फेडायचं असतं

असं म्हणत खांद्यावरून दादूनी हात काढून घेतला
काठी टेकत हळू हळू पुढचा प्रवास चालू केला

सॉरी म्हणत दादूला मी कट्ट्यावरून निघू लागलो
पश्चात्ताप तरी कसा करू असा विचार करू लागलो

दादू म्हणाला थांब एवढा विचार नको करू
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा आपलं नातं सुरू करू

एका वाक्यात दादू सगळं काही बोलून गेला
आयुष्यभर झिजला तरी शेवटी माफ करून गेला


-मंगेश केळकर
(२१ एप्रिल २०१४)

Tuesday, May 29, 2012

दोर...


शेतकरी आणि त्यांचे जिवा-शिवा याचं अतूट नातं आपल्याला माहीतच आहे. पण जिवा-शिवांच्या गळ्यातले दोर हे आता शेतक-याच्या गळी येत आहेत.
शेतीशास्त्र आणि शेतकरी कितीही पुढे जात असले तरी सावकाराकडून त्यांची सुटका अजुनही होत नाहीये. आमिषांना बळी पडणारे शेतकरी ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही.
आशाच आमिषांना भुललेल्यांची ही कहाणी.                                             नभ दाटून दाटून कसा काळोख पडला
                                             बैल नांगरी लागला, चातक वरी आला

                                             ढग दाखवी आमिष, पाण्याने ओतप्रोत
                                             एक झुळुक वा-याची, जाई पनतीची जोत

                                             मग तांबड्या तांबड्या भुईस रग लागे
                                             इथं मुरंत हुतं पाणी, ठिपुस शोधु लागे

                                             सावकारी दाही दिशा होई जिवा वण वण
                                             घरा कुटुंब बसले घेऊन हाती प्राण

                                             मग शोधु लागे वॄक्ष उभा वेशीवरी दूर
                                             लावी आतडीस पीळ चार पैसाची ती दोर

                                            -मंगेश

Wednesday, May 9, 2012

होशील का माझी...???


प्रेम म्हटलं की रुसवे फुगवे हे आलेच. पण ह्या रुसव्या फुगव्यांची पण एक वेगळीच मजा असते.
कितीही भांडणं झाली, वाद झाले तरी शेवटी "तुझं माझं पटेना, अन् तुझ्यावचून करमेना" अशीच अवस्था असते.असं म्हणतात भांडण प्रेमाचाच एक भाग आहे, आपलं अगदी असंच पण तरी कहीसं वेगळं आहे..

प्रेमाचं भांडण आणि भांडणातलं प्रेम, फुगलेले गाल तुझे दोन्ही सेम टू सेम...

टपोरी आसवं मिटलेले डोळे, हळुवार स्पर्श त्यातुन सगळं काही कळे...

तुझं माझं करता करता हळूच गाली हसणं, पापण्यांच्या आडूनच सगळं काही सांगणं...

असं वाटतं आता फक्त तुझ्याच साठी जगावं, दिवस रात्र डोळ्यांपुढे तुलाच घेऊन बसावं...

कितीही झाला तंटा तरी तुझाच विचार करतो, "होशील का माझी??" पुन्हा एकदा विचारतो...


फक्त तुझाच-
मंगेश

Sunday, August 28, 2011

पैलतीर...


सध्या माणसाचं महत्त्व एक "माणूस" म्हणून कमी होत चाललं आहे. आज काल मैत्री करताना सुद्धा हा मित्र पुढे आपल्याला कसा उपयोगी येईल याचा विचार आधी होतो आणि मगच मैत्री होते.
नाती जपण्याआधी स्वार्थ जपला जातो आणि ह्याला "काळाची गरज" असं म्हणून दुर्लक्षित केलं जातं.
जो पर्यंत माणसाच्या शब्दाला किंमत आहे तो पर्यंत त्यालाही किंमत असते, पण जेव्हा त्याचे शब्दच संपतात तेव्हा माणूस म्हणून देखील त्याला कवडी मोलाचीही किंमत मिळत नाही.
क्षणार्धात सगळ्या गोष्टी होत्याच्या नव्हत्या होऊन जातात.


                         नाव ती लाटेवरी काठावरून मी पाहिले
                         पाहिले जे ह्या तटावरी त्या तटावरी राहिले...

                         पाहता तो डोह मोठा श्वास माझा थांबला
                         भान सारे भंग झाले अश्रु सारे वाहिले...

                         पापण्या लवल्या जरा त्या अश्रुंना थांबावया
                         अश्रु सारे हासती डोळ्यांमधे ना थांबले...

                         शब्द आणि अर्थ त्यांचे वित्त त्यांना मोजुनी
                         भाबडी ती मूर्त त्याची देतसे धुडकावुनी...

                         पाहतो मी आज ज्यांना हे ते नव्हे जे पाहिलेले
                         मित्र आणि आप्त सारे दूर आज राहिलेले...

                        -मंगेश केळकर

Friday, August 12, 2011

कधी कधी असं वाटतं...


ह्या जगात न थांबणारी एकच गोष्ट म्हणजे "वेळ". रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात हा "वेळ" कसा, कधी आणि कुठे निघुन जातो ह्याचं आपल्याला भानंच राहत नाही. वेळ निघुन गेल्यावर मात्र नेहमीच वाटतं राहतं की काहीतरी राहून गेलं. मग अशावेळी आपल्या आठवणीतले छोटे छोटे क्षण देखील ही उणीव भरून काढणारे ठरतात. खूप महत्त्वाचे आणि अमूल्य असे वाटतात.

खरंच, जीवनातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लाखमोलाचा ठेवा असतो आणि तो आपण सगळ्यांनीच जपायला हवा.


                             कधी कधी असं वाटतं त्याच कट्ट्यावर पुन्हा जमावं,
                             मित्र आणि कटिंग सोबत तासंतास पडून रहावं...
                             शाळेच्या गप्पा आणि कॉलेजचे किस्से व्हावेत,
                             प्रोफेसर्स्‌च्या नकला आणि गिटारवरचं एक गाणं व्हावं...

                             कधी कधी असं वाटतं तिच पिकनीक पुन्हा निघावी,
                             भरलेल्या पावसात घाटामधुन गाडी आपली स्वैर फिरावी...
                             समुद्रावरचे किस्से अन्‌ डोंगर सारे सर करावेत, 
                             एक तरी पेग चीअर्स करून रात्र सुध्दा गाजवून द्यावी...

                             कधी कधी असं वाटतं बॉसचं म्हणणं मुद्दाम टाळावं,
                             मिटिंग रिक्वेस्ट डिनाय करून मस्त कॅन्टिन मधे फिरत बसावं,
                             लेक्चर बंक केल्याची मग आठवण व्हावी 
                             आणि प्रोक्झी लागल्याचं समाधान पण मिळावं...

                             कधी कधी असं वाटतं पुन्हा ताईची खोडी काढावी,
                             मग बाबांनी ओरडा द्यावा आणि आईनी माया करावी...
                             असं वाटतं मनातलं सारं काही बोलून जावं,
                             पण तिची नजर वळण्याआधीच आपली बोलती बंद व्हावी...

                             मग मधेच कधीतरी असं वाटतं हे सगळं परत घडेल का?
                             निसटलेल्या गोष्टी पुन्हा आपल्या हाती येतील का?
                             मग मनात कितीही वाटलं तरी वेळ असाच निघुन जातो
                             प्रश्न फक्त एकच राहतो की "ह्या आठवणी तरी राहतील का?"

                            -मंगेश केळकर