Monday, April 21, 2014

दादू

Elder Care Issues: How to Reduce Caregiver Anxiety Symptoms

परवा आमच्या कट्ट्यावर पहिल्यांदाच दादू आला होता
नव्वदीचा असेल पण पहिल्यापासूनच चेहरा जरा ओळखीचा वाटत होता

जेष्ठ नागरिक कट्ट्यावर हे काका नवे होते
सर्वांनाच ते कोण आहेत ह्याचे मोठे कुतुहल होते

माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यानी सुरुवात केली
पहिलाच शब्द ओठी येता मोठ्ठी ढास लागली

पाणी दिले थोडे मग दादू बोलू लागला
स्वत:चे नाव सोडून बाकी सगळं काही सांगू लागला

म्हणाला कलेक्टर होतो शहराचा माझा मोठ्ठा मान होता
विचारा तुमच्या वडिलांना शहरात माझा दरारा होता

लग्न करून सेटल झालो एका गोंडस बाळाचा बाप झालो
’विश्वास’ नाव ठेवून सुद्धा पंचवीस वर्षांनी पस्तावलो

म्हणा नावात काय आहे आमचे नशीबच फुटके होते
बापानी विणलेल्या गोधडीचे धागेच जरा ढिले होते

स्वप्नामागे धावता धावता तो सत्य मात्र विसरून गेला
गोधडीचे ढिले धागे एका क्षणात तोडून गेला

नाही म्हणायला बापासाठी एक गोष्ट केली होती
या आश्रमाची दारे त्यानी उघडी करून दिली होती

मग काही वर्षांनी कळले तो ही गोधडी विणतो आहे
विश्वासाने हळू हळू एक एक धागा ओवतो आहे

त्याच गोधडीच्या उबेत एक छान पिल्लू मोठे झाले
थोड्याच दिवसांत पंख फुलवून ते देखील तसेच उडाले

पंचवीस वर्ष या आश्रमात आनंदानी राहत होतो
आज त्यालाही इथे बघून पुरता निराश झालो होतो

समोर बघून थांबला पण ओळखलं मात्र नाही
हळुवार हसून पुढे निघाला काही बोलला ही नाही

त्याची नजर मी वाचली होती भाव त्याचे कळले होते
आठवले ते क्षण जे पंचवीस वर्षांपूर्वी बघितले होते

हाक मारून त्याला जवळ मी बोलावले
माझं नाव कसं माहित म्हणून त्याने विचारले

म्हटलं कुंभाराला त्याचा प्रत्येक घडा माहित असतो
कसाही आकार असला तरी त्यानीच तो घडवलेला असतो

काळजी करू नकोस, इथे आपल्या सगळ्यांचंच सगळं सारखं असतं
स्वत:चं आयुष्य स्वत:च कोरायचं असतं आणि ह्या जन्मीचं ह्याच जन्मी फेडायचं असतं

असं म्हणत खांद्यावरून दादूनी हात काढून घेतला
काठी टेकत हळू हळू पुढचा प्रवास चालू केला

सॉरी म्हणत दादूला मी कट्ट्यावरून निघू लागलो
पश्चात्ताप तरी कसा करू असा विचार करू लागलो

दादू म्हणाला थांब एवढा विचार नको करू
आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा आपलं नातं सुरू करू

एका वाक्यात दादू सगळं काही बोलून गेला
आयुष्यभर झिजला तरी शेवटी माफ करून गेला


-मंगेश केळकर
(२१ एप्रिल २०१४)